भोसरी एमआयडीसीतील अमेझोन कंपनीच्या गोडावून मधून ४ लाख ५० हजारांच्या ऐवजासह टेम्पो लंपास

0
441

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – एमआयडीसीतील अमेझोन कंपनीच्या गोडावून मधून ४ लाख ५० हजारांचा माल घेऊन निघालेल्या टेम्पोचालकाला धमकावून त्याच्या ताब्यातील टेम्पो अज्ञात दोघा चोरट्यांनी पळवून नेला. ही घटना गुरुवारी (दि.२०) दुपारी साडेबाराच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील अमेझोन कंपनीच्या गोडावूनजवळ घडली.

याप्रकरणी त्रिवणे धनुषधारी यादव (वय २८, रा. नवजीवन हौसिंग सोसायटी, नेहरुनगर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्रिवणे यादव यांचे भोसरी एमआयडीसीत अमेझोन कंपनीचे गोडावून आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना गोडावून मधून एका टेम्पोत ४ लाख ५० हजारांचा माल भरुन खडकीकडे पाठवायचा होता. यावेळी माल भरुन (एमएच/४३/एडी/१५९१) या क्रमांकाचा टेम्पो गोडाऊनच्या गेट बाहेर पडताच अज्ञात दोघा चोरट्यांनी टेम्पोचालकाला धमकवले. तसेच तो टेम्पो घेऊन पसार झाले. टेम्पो आणि त्यातील माल असा एकूण ५ लाख ५० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.