भोसरीमध्ये पादचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याप्रकरणी महावितरणचा संबंध नाही…

0
325

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) भोसरी येथील धावडेवस्तीमध्ये रस्ता दुभाजकावरील वीजखांबाच्या वायरचा शॉक लागल्यामुळे पादचाऱ्याचा रस्त्यावर पडून ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. मात्र या घटनेत वीजखांबाच्या (पथदिव्याच्या) वायरचा शॉक लागल्याप्रकरणी महावितरणचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

भोसरी येथील धावडेवस्तीमध्ये रस्ता ओलांडताना दुभाजकावरील वीजखांबाचा वायरचा शॉक लागून रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकने दिलेल्या धडकेत रवी महादेव जोगदंड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणकडून लगेचच स्थळ पाहणी करण्यात आली. यामध्ये सदर वीजखांब हा पथदिव्याचा (स्ट्रीटलाईट) आढळून आला. या पथदिव्यांची वीजयंत्रणा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची असून त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबादारीही महानगरपालिकेकडेच आहे. त्यामुळे पथदिव्याशी व शॉक लागल्याच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही. याबाबत महावितरणकडून संबंधीत पोलीस स्टेशनला लेखी पत्राद्वारे देखील कळविण्यात आले आहे.