भोसरीत सोनाराने सोने गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्यास सांगून ग्राहकाची केली ६ लाखांची फसवणूक

0
662

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – सोने गुंतवणूक योजनेत ६ लाख रुपये गुंतवण्यास सांगून एका सोनार आणि त्याच्या पत्नीने ग्राहकाला खोटे सोन्याचे बिस्कीटे दिली तसेच त्याचा योग्य मोबदला न देता ग्राहकाची फसवणूक केली. ही घटना जानेवारी २०१२ ते जानेवारी २०१७ दरम्यान भोसरी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात घडली.

याप्रकरणी ग्राहक अरुण पोपट काकडे (वय ५५, रा. वडगाव शिंदे, ता.हवेली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, भोसरी दिघी रस्त्यावरील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे मालक नरेश वडीचार (वय ४४) आणि त्यांची पत्नी रजनी वडीचार (वय ४०) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश आणि त्यांची पत्नी रजनी यांचे भोसरी दिघी रस्त्यावर लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. जानेवारी २०१२ मध्ये या दोघांनी फिर्यादी अरुण काकडे यांना सोने गुंतवणूक योजनेत सहा लाख रुपये गुंतवण्यास सांगून त्या बदल्यात त्यांना सोन्याचे बिस्कीटे दिली. फिर्यादी हे सोन्याचे बिस्कटे पुन्हा त्यांना देऊन पैसे घेण्यास गेले असता ते बिस्कीटे खोटे असल्याचे समोर आले आणि आरोपींनी काकडे यांना त्यांचा मोबदला न देता फसवणूक केली. याप्रकरणी नरेश आणि त्यांची पत्नी रजनी या दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.