Bhosari

भोसरीत सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त  

By PCB Author

August 08, 2018

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – भोसरी इंद्रायणीनगर येथील मिनी मार्केट जवळून एका सराईत गुन्हेगाराला एक गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस असा २० हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी भोसरी एमआयडीसी पोलिस आणि डीबी स्टाफ यांनी संयुक्तरित्या केली.

भिमसिंग धनसिंग थापा (वय २१, रा. बिल्डिंग नं. १०/३, हनुमान मंदीराच्या मागे, इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकार्ड वरील सराईत गुन्हेगार भीम थाबा हा इंद्रायणीनगर येथील मिनी मार्केटच्या पार्कींगमध्ये उभा असून त्याच्याजवळ एक पिस्तूल आहे अशी खात्रीशीर माहिती एका खबऱ्या कडून भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई विजय दौंडकर यांना मिळाली. यावर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांनी डीबी स्टाफसह भोसरी इंद्रायणीनगर येथील मिनी मार्केटच्या पार्किंगमध्ये सापळा रचून भिमसिंग याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीची एक पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी भिमसिंग याला अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्याक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय टिकोळे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार अजय भोसले, रविंद्र तिटकारे, संदीप भोसले, पोलीस नाईक संजय भोर, किरण काटकर, पोलीस शिपाई नवनाथ पोटे, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अमोल निघोट व करन विश्वासे, विशाल काळे यांच्या पथकाने केली.