भोसरीत शिवसेना खासदारासमोरच पालक आणि संस्थाचालकांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा दाखल

0
1078

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – अनुदानित तुकड्यांना फी आकारल्याच्या कारणावरून भोसरीतील एका शाळेत गोंधळ सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचे खासदार यांच्या उपस्थितीत शिक्षण अधिकारी, नगरसेवक आणि पालक यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर शाळेच्या आवारातच खासदार आढळराव पाटील  यांच्यासमोरच संस्थाचालक आणि पालकांत हाणामारी झाली. हा प्रकार शुक्रवारी (दि. ६) दुपारी पावणेचारच्या सुमारास भोसरी येथील स्वामी समर्थ विद्या मंदीरमध्ये घडला.

या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संस्थाचालक यशवंत बाळासाहेब बाबर (वय ६२, रा. स्पाईनरोड, मोशी) यांच्या फिर्यादीवरून शिवसेनेचे बबन मुकटे यांच्यासह अशोक खर्चे, इंदुताई लक्ष्मण घटनवट, विश्वास टेमगीरे, निलेश मुकटे, शिवाजी पडवळ (सर्व रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्याविरुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिवसेनेच्या बबन रामदास मुकटे (वय ३९, रा. अक्लॉन स्वेअर्स, इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्या फिर्यादेनुसार यशवंत बाबर व त्यांची दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करणयात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये अमर ज्योत शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ विद्या मंदीर या शाळेत अनुदानित तुकड्यांना फी आकारल्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासूनच पालक आणि संस्थाचालकांमध्ये वाद सुरू आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचे खासदार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीनंतर संस्थाचालक बाबर आणि सेनेचे मुटके यांच्यात शाब्दिक वाद झाले. या वादाचे पर्यावसन भांडणात होऊन शाळेतच हाणामारी झाली. विषेश म्हणजे हा सर्व प्रकार शिवसेनेचे खासदार यांच्या समोरच घडला. संस्थाचालक बाबर यांच्या आरोपानुसार बबन मुटके यांनी जमाव जमवुन संगनमताने बाबर यांच्या मुलांना शिवीगाळ केली. तसेच काठीने मारहाण केली. तर मुकटे यांच्या आरोपानुसार संस्थाचालक बाबर यांनी बैठक संपल्यानंतर धारदार वस्तुने मुटके यांच्या मानेवर आणि पोटावर मारहाण करून त्यांना जखमी केले. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिस तपास करत आहेत.