भोसरीत विलास लांडे यांची नवी राजकीय सेटिंग; लांडेंच्या होर्डींगवर सचिन पटवर्धनांचा फोटो

0
7506

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – भाजपमध्ये गेलो असतो, तर जानवे घालावे लागले असते. ते मला मान्य नव्हते, असे वक्तव्य करणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी लावलेल्या एका जाहिरात फलकावर भाजपचे राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांचा फोटो झळकला आहे. लांडे आणि पटवर्धन यांच्यातील या राजकीय सेटिंगमुळे भोसरीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लांडे हे पटवर्धनांच्या मार्फत भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना?, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे विलास लांडे यांच्यासोबत पटवर्धनांचा प्रथमच फोटो झळकल्याने भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे गट सावध झाला आहे.

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे शिक्षणसम्राट आहेत. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून ते शाळा, महाविद्यालये चालवितात. त्यांच्या संस्थेच्या वतीने १० ते १२ जानेवारीदरम्यान भोसरीतील लांडेवाडीमध्ये व्याख्यानमाला, जिजाऊ पुरस्कार तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी भोसरीमध्ये होर्डिंग लावून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या जाहिरात फलकावर माजी आमदार विलास लांडे यांच्यासह भाजपचे राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांचाही फोटो झळकला आहे.

त्याचप्रमाणे महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. परंतु, या जाहिरात फलकावरील सचिन पटवर्धन यांच्या फोटोमुळे भोसरीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विलास लांडे यांच्यासोबत पटवर्धन यांचा प्रथमच फोटो झळकल्याने राजकीय निरीक्षकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. ही कोणती नवीन राजकीय सेटिंग? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. लांडे हे पटवर्धांच्या मध्यस्थीने भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना?, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

माजी आमदार विलास लांडे यांनी पाच-सहा महिन्यांपूर्वी भोसरीतील एका कार्यक्रमात बोलताना भाजपमध्ये गेलो असतो, तर जानवे घालावे लागले असते. ते मला मान्य नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्यावरून लांडे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टिकाही झाली होती. आता त्याच लांडे यांनी आपल्या जाहिरात फलकावर भाजपच्या सचिन पटवर्धनांचा फोटो झळकवल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, विलास लांडे आणि सचिन पटवर्धन यांच्यातील या राजकीय सेटिंगमुळे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे गट सावध झाल्याचे चित्र आहे.