भोसरीत मैथिली गाण्यांनी रंगले होली मिलन; चित्रप्रदर्शनातून घडले संस्कृतिचे दर्शन

0
517

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – मिथिला विकास मंचतर्फे रोजगार आणि व्यवसाय तसेच नोकरीनिमित्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरात स्थायिक झालेल्या उत्तर भारतातील मैथिली भाषक बांधवांसाठी होली मिलनानिमित्त आयोजित कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. लोकसंगीत आणि गायनाने या सांस्कृतिक आणि रंगारंग कार्यक्रमात रंगत आणली. प्रदर्शनातील चित्रांतून मैथिली संस्कृतीचे दर्शनही घडले.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कार्यक्रम झाला. यावेळी आमदार महेश लांडगे, मंचचे अध्यक्ष मिहिर झा, सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक ठाकुर, दीपेंद्र झा, मृदुकान्त पाठक, शंकर झा, डॉ. मनमोहन झा, सुधीर चंद्र मिश्र, पूर्वांचल मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा, उपाध्यक्ष नेताजी सिंह आदी उपस्थित होते.

बिहारच्या ख्यातनाम गायिका पूनम मिश्रा, गायक माधव राय आणि पुण्यातील गायिका शिखा झा आणि स्मृती ठाकुर यांनी गीतगायन केले. मैथिली लोकसंगीत आणि पारंपरिक गाणी तसेच उडत्या चालीची गाणी सादर करून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. रामसेवक ठाकूर यांनी गमतीदार किस्से सादर करून उपस्थितांना पोटधरून हसविले.

मंचचे अध्यक्ष मिहिर झा म्हणाले, “पुणे-दरभंगा रेल्वेसेवा दररोज सुरू झाली पाहिजे. त्यासाठी मैथिली भाषकांनी एकत्र आले पाहिजे. संघटित झाल्यास मागणीस पाठबळ मिळेल. मंचच्या माध्यमातून ही मागणी लावून धरण्यात आली आहे.’’

मंचचे सचिव राकेश मिश्रा, कोषाध्यक्ष बालकृष्ण मिश्र, ललित ठाकुर, श्रवण चौधरी, सुधेन्दु रॉय, सरोज झा, रविंद्र झा, मनोज झा, शंकर झा, मृदुकान्त पाठक, अजय झा, प्रवीण झा, हर्षवर्धन मिश्रा, उमेश मंडल, नारायण झा, दिग्विजय झा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. आमदार महेश लांडगे, डॉ. मनमोहन झा आणि डॉ. डी. के. झा यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. मंचचे सचिव राकेश मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले.