भोसरीत महिला वकिलाची ६५ लाखांची फसवणुक

0
670

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – बनावट दस्त तयार करून एका महिला वकिलाची ६५ लाखांची फसवणूक करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २४ एप्रिल ते १५ जुन २०१९ दरम्यान भोसरी येथे घडली.

याप्रकरणी पद्मीनी राजे मोहिते (वय ४९, रा. फुगेवाडी, सध्या रा. आखरा बट्टा, श्रिोही, राजस्थान) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धीरज सुरेश लांडगे (रा. आळंदी रोड, भोसरी) आणि नीलेश सुरेश कुदळे (रा. मोशी) या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मीनी राजे या मुळ राजस्थानच्या असून वकील आहेत. त्यांची मोशी येथे १० गुंठे जमीन आहे. ती जमीन विक्री करतो असे आरोपी धीरज लांडगे याने फिर्यादी मोहिते यांना सांगितले. आरोपी नीलेश कुदळे याला जमीन विक्री करतो, असे सांगून दस्त बनविला. फिर्यादी मोहिते यांना दाखविलेला दस्ताचा नमुना व त्यांनी नोंदणी करताना वापरलेला दस्त बनावट तयार केला. तसेच नीलेश कुदळे याच्या बँक खात्यावरील धनादेश दिले. २५ लाख, २० लाख आणि २० लाख असे एकूण ६५ लाखांचे तीन धनादेश फिर्यादी मोहिते यांना दिले. मात्र तीनही धनादेश वटले नाहीत. तीनही धनादेश ‘बाऊन्स’ झाल्याने फिर्यादी मोहिते यांना ६५ लाख रुपये मिळाले नाहीत. यातून आर्थिक फसवणूक करून आरोपींनी फिर्यादी मोहिते यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक गाढवे तपास करत आहेत.