Bhosari

भोसरीत पूर्ववैमनस्यातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

By PCB Author

May 02, 2019

भोसरी, दि. २ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका कुटुंबातील सहा जणांनी दुसऱ्या कुटुंबाच्या घरात घुसून आईवडिलांसह मुलाला लोखंडी रॉड आणि दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.३०) रात्री सव्वानऊच्या सुमारास गवळी माथा, गणेशनगर हनुमान मंदिराजवळ घडली.

याप्रकरणी हनुमंता नागनाथ माने (वय २९, रा. गणेशनगर हनुमान मंदिराजवळ, भोसरी) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महादेव माने, सुखदेव माने, प्रकाश शिंदे, चंद्रकांत माने, सोन्या पवार आणि गौरी पवार (सर्व रा. गणेशनगर हनुमान मंदिराजवळ टेल्कोरोड, भोसरी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास एकाच कुटुंबातील सहाजणांनी फिर्यादी हनुमंता माने याच्या घरात घुसून त्याला आणि त्याच्या आईवडिलांना लोखंडी रॉड आणि दांडक्याने जबर मारहाण केली. यामध्ये हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक ए.के.पुजारी तपास करत आहेत.