भोसरीत पादचाऱ्याला मारहाण करुन चोरट्यांनी पळवले पैसे आणि मोबाईल

513

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – मित्रासोबत पायी घरी जात असताना अज्ञात दोन चोरट्यांनी एकाला धक्का लागल्याचे नाटक करुन त्याला मारहाण करत त्याच्याजवळील रोख रक्कम आणि २ मोबाईल असा एकूण ३७ हजार २०० रुपयांचा ऐवज जबरदस्ती चोरुन नेला. ही घटना बुधवार (दि.१३) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास टेल्को रोड शाहुनगर चिंचवड ते टेल्कोरोड बालाजीनगर या रस्त्या दरम्यान घडली.

कृष्णप्रसाद देवेंद्रप्रसाद यादव (वय ३०, रा. आर.बी २, ४७७/एफ, डब्लू स्टोरी रेल्वे कॉलनी, होसंगाबाद, मध्यप्रदेश) असे मारहाण करुन लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास फिर्यादी कृष्णप्रसाद यादव हा त्याच्या मित्रासोबत पायी टेल्को रोड शाहुनगर चिंचवड ते टेल्कोरोड बालाजीनगर या रस्त्यावरुन घरी जात होता. यावेळी अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांना मुद्दामुन धक्का मारुन भांडण काढले. त्यानंतर कृष्णप्रसाद याला मारहाण करुन त्याच्याजवळील रोख रक्कम आणि २ मोबाईल असा ३७ हजार २०० रुपयांचा ऐवज जबरदस्ती चोरुन पसार झाले. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.