भोसरीत पाच जणांच्या टोळक्यांनी तरुणावर केले कोयत्याने वार

0
3187

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – मित्राला मारल्याच्या संशयातून पाच जणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार (दि.१५) रात्री सव्वादहाच्या सुमारास भोसरी आळंदी रस्त्यावर हनुमान कॉलनीजवळील मैदानात घडली.

विरेंद्र विश्र्वनाथ चव्हाण (रा. नुर मोहल्ला, दिघी रोड, भोसरी) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल विश्वनाथ दत्तु चव्हाण (वय ४२ रा. नुर मोहल्ला, दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोशन सवडतकर (रा. सॅन्डवीक कॉलनी समोर, दिघी रोड, भोसरी), वैभव ढोरे (रा. राजमातानगर, सहकार कॉलनी नं.३, दिघी), ह्रतिक रसाळ (रा. गुळवे मैदान, भोसरी), प्रज्वल कोलते (रा. हुतात्मा चौक, दिघी) आणि सोन्या जगताप (रा. सायगाव खेड) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास विरेंद्र चव्हाण हा त्याच्या दुचाकीवरुन चालला होता. यावेळी पाचही आरोपींनी त्याचे अपहरण करुन त्याला आळंदी रोडवरील हुतात्मा चौकाजवळील महापालिकेच्या मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याला, “आमच्या मित्राला का मारले असे विचारले, विरेंद्रने मी कोणाला नाही मारले असे उत्तर देताच आरोपींनी विरेंद्र याचा पाय, हात आणि पाठीवर कोयत्याने वार केले. तर लाकडी दांडक्याने आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करुन गंभीर जखमी करुन फरार झाले. याप्रकरणी या पाचही आरोपींविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलीस तपास करत आहेत.