भोसरीत पतीने अपहरणाचा बनाव रचून पत्नीकडेच मागीतली ५ लाखांची खंडणी

0
1397

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – पाच लाखांच्या खंडणीसाठी एका इसमाने मित्राच्या सहायाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव करुन पत्नीकडेच ५ लाखांची खंडणी मागीतल्याचा प्रकार समोर आला आहे. अपहरणाचा बनाव मंगळवारी (दि.२०) सकाळी दहाच्या सुमारास भोसरीतील गवळीनगर येथील टाटा ऑटो कन्सल्टन्सी या कंपनीजवळ करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी काही तासातच या गुन्ह्याचा छडा लावत बनाव उधळला.

विठ्ठल वाबळे (वय ३३, रा. भोसरी) आणि त्याचा साथीदार बापू उर्फ कासमचाँद मुलाणी (वय ५१, रा. पर्वती, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास विठ्ठल वाबळे हे ते कामाला असलेल्या भोसरीतील गवळीनगर येथील टाटा ऑटो कन्सल्टन्सीच्या कार्यालयात गेले. तेथून त्यांचे अपहरण झाल्याचे त्यांच्या पत्नी सीमा वाबळे यांना फोनवर कळवण्यात आले. यावर त्यांनी तातडीने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती विठ्ठल यांना सोडण्यासाठी आरोपींनी ५ लाखांची खंडणी मागितल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलीसांनी जलद गतीने तपास चक्रे फिरवत तांत्रिक माहिती गोळा करुन वाबळे यांचे लोकेशन ट्रेस केले. यावेळी ते स्वारगेट जवळ असल्याचे समोर आले. पोलिसांनी स्वारगेट परिसरातील सर्व लॉजमध्ये शोधाशोध सुरु केली. या दरम्यान एका लॉज मधील कर्मचाऱ्याला विठ्ठल वाबळे यांचा फोटो दाखवला असता त्याने त्यांना ओळखले आणि ते लॉज मधीलच एका रुममध्ये असल्याचे पोलिसांना सांगितले. यावर पोलीसांनी अतिशय शिताफीने रुममध्ये प्रवेश करुन वाबळे यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता अपहरणाचा बनाव त्याने त्याचा मित्र कासमचाँद मुलाणी याच्या सोबत मिळून रचल्याचे सांगितले. तसेच मेहुण्याकडून पैसे उकळण्यासाठी हा बनाव रचला असल्याचे कबुल केले. ही कारवाई खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने केली. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.