भोसरीत दादागिरी वाढल्याचे विलास लांडे यांचे म्हणणे म्हणजे “सौ चूहे खाके बिल्ली चली हज को”

0
1754

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – सलग दहा वर्षे आमदार, घरात अडीच वर्षांचे महापौरपद, एक वर्षाचे स्थायी समितीचे अध्यक्षपद अशा महत्त्वाच्या पदांचा उपभोग घेऊन झाल्यानंतर माजी आमदार विलास लांडे यांना आता भोसरी विधानसभा मतदारसंघात दादागिरी वाढल्याचा साक्षात्कार झाला आहे. तब्बल साडेतीन वर्षे ही दादागिरी न दिसलेल्या लांडे यांना आता अचानक हा साक्षात्कार होण्यामागचे कारण काय? लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याची चाहूल लागल्यामुळे तर हा साक्षात्कार झाला नाही ना?, लांडे यांच्याकडे तब्बल दहा वर्षे आमदारपद असताना भोसरी मतदारसंघात कुठे शांतता नांदत होती?, असे अनेक प्रश्न भोसरी मतदारसंघातील मतदारांना पडले आहेत. मतदारसंघात दादागिरी वाढल्याचे लांडे यांचे म्हणणे म्हणजे “सौ चूहे खाके बिल्ली चली हज को”, असा प्रकार असल्याचे मानले जात आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ मानला जातो. तसेच हा मतदारसंघ शहरातील मागास मतदारसंघ म्हणूनही गणला जातो. विकासाच्या बाबतीत या मतदारसंघात बजबजपुरी माजल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत शहरातील अन्य भागाच्या तुलनेत दहा वर्षे मागे असल्याचे म्हटले जाते. या मतदारसंघातील पुढाऱ्यांकडून विकासकामांना होणारी आडकाठी, स्थानिकांचा सतत होणारा विरोध, ठेकेदार, बिल्डर, कंपन्यांचे मालक व सर्वसामान्यांवर होणारी प्रचंड दादागिरी आणि व्हिजन नसणाऱ्या राजकीय नेतृत्वांमुळे भोसरी मतदारसंघ भकास म्हणून ओळखला जातो. परंतु, तीन-चार वर्षांत या मतदारसंघात विकासाने थोडी गती पकडल्याचे दिलासादायक चित्र आहे.

सध्या या मतदारसंघात होणारा विकास दिसण्यासाठी आणखी तीन-चार वर्षे वाट पहावी लागणार आहेत. परंतु, माजी आमदार विलास लांडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केलेल्या वक्तव्यांवरून भोसरी मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. या मतदारसंघात दादागिरी वाढल्याचे लांडे यांनी म्हटले आहे. लांडे हे आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून गेली साडेतीन वर्षे राजकीय अज्ञातवासात होते. आता त्यांना असे अचानक साडेतीन वर्षानंतर आपल्या मतदारसंघात दादागिरी वाढल्याचा साक्षात्कार का झाला?, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यामुळे लांडे यांना हा साक्षात्कार झाला नाही ना? स्वतः दहा वर्षे लोकप्रतिनिधीत्व करते होते, त्यावेळी या मतदारसंघात दादागिरी नव्हती का?, आमदार असताना लांडे यांना भयमुक्त भोसरी मतदारसंघ करण्यासाठी कोणी अडविले होते?, असे अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत.

लांडे हे चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी दादागिरीबाबत केलेले वक्तव्य हे पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठीची रणनितीही असू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. चर्चेत राहण्यासाठी आणि आपण सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवतो, हे आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवून देण्याच्या उद्देशाने लांडे यांनी भोसरी मतदारसंघातील दादागिरीचा मुद्दा उपस्थित केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय शिमगा आणि धुळवडीला सुरूवात होते. लांडे यांनी दादागिरीबाबत प्रश्न उपस्थित करून भोसरी मतदारसंघात विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात राजकीय शिमगा आणि धुळवडीला सुरूवात केल्याचे मानले जात आहे. आता त्यांचे विरोधक आमदार महेश लांडगे हे विलास लांडे यांना काय प्रत्युत्तर देतात?, हे पाहणे राजकीय उत्सुकतेचे ठरणार आहे.