भोसरीत तिघा सराईत चोरट्यांना दहा लाखांच्या मुद्देमालासह अटक; एकूण १२ गुन्हे उघड

0
1504

भोसरी, दि.२९ (पीसीबी) – घरफोडी आणि वाहन चोरी अशा वेगवेगळ्या गुन्ह्या प्रकरणी भोसरी पोलीसांनी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या सराईतांकडून सोने, चांदे, रोख रक्कम, दुचाकी आणि चारचाकी असा एकूण १० लाख ७ हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्त केला असून एकूण १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ३३, रा. सर्वे नं. ११०, कोठारी शोरुमजवळ, सोनाल वस्ती, रामटेकडी, हडपसर), सचिन केरुनाथ पारधे (वय ३१, रा. बर्गे वस्ती, एकनाथ जेधे यांची रुम, चिंभळी, मुळ.रा. राहता, जि. अहमदनगर) आणि एक १७ वर्षीय विधीसंघर्षित तरुण असे वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस, पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना त्यांच्या खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी आणि दरोड्या सारख्या गंभीर स्वरुपातील अट्टल गुन्हेगार ज्याला तब्बल २९ गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे आणि १३ गुन्ह्यांमध्ये तो सध्या फरार आहे. तो चाकण येथे जाण्यासाठी भोसरी येथे येणार आहे. यावर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांनी भोसरीतील बस स्टॉपवर सापळा रचून आरोपी संगतसिंग कल्याणी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकट्या भोसरीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल सहा घरफोड्या केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून १३.५ ग्रम सोन्याचे दागिने, २३६२ ग्रॅम चांदीचे दागिने आणि दहा हजार रोख असे एकूण ४ लाख ९० हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला.

दुसऱ्या प्रकरणात भोसरी पोलीसांनी सराईत दुचाकी चोर सचिन पारधे याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल ७ दुचाक्या आणि एक मोबाईल असा एकूण ३ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला. त्याच्याकडून भोसरीतील २, निगडी आणि पिंपरीतील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. तर त्याच्याकडे सापडलेल्या इतर ३ वाहनांचा पोलीस तपास करत आहेत.

तिसऱ्या प्रकरणात भोसरी पोलीसांनी एका १७ वर्षीय विधीसंघर्षित तरुणाला अटक केली आहे. पोलीसांनी त्याच्याकडून एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या दोन कार जप्त केल्या आहेत. यामुळे भोसरी आणि खडकी येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. यामुळे एकूण तिन वेगवेगळ्या प्रकरणात भोसरी पोलीसांनी तिघा चोरट्यांना अटक करुन एकूण १० लाख ७ हजारांचा मुद्देमाल हस्त केला आणि तब्बल १२ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ १ पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, काळुराम लांडगे पोलीस हवालदार जी.एन.हिंगे, कदम, एस.एच.डोळस, एस.देवकर, एस.एल.रासकर, एन.ए.खेसे, एस.बी.महाडीक, एस.वाय.भोसले, बी.व्ही.विधाते यांच्या पथकाने केली.