Banner News

भोसरीत जागतिक विक्रमाचा उपक्रम ‘किल्ले बनवा’ राज्यस्तरीय ‘युवा महोत्सव’ चे आयोजन

By PCB Author

December 27, 2019

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) – महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.५ जानेवारी २०२०) भोसरीमध्ये ५०० गडकोट किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याचा जागतिक विक्रमाचा उपक्रम होणार आहे.

महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडशेनच्या वतीने यापूर्वी शहरात पर्यावरण जनजागृती, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण, वारकरी सांप्रदाय, अध्यात्म क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यावेळी इयत्ता ३री ते १०वीतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची व गडकोट किल्ल्यांची माहिती व्हावी व या गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने विश्वविक्रमी ‘किल्ले बनवा’ हा जागतिक विक्रमाचा उपक्रम व राज्यस्तरीय ‘युवा महोत्सव’ हे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. आज शुक्रवारी (दि.२७) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहूल जाधव, कार्यक्रमाचे समन्वयक अजित सस्ते, नितीन मोरे, मनोज काळे, माधव कुलकर्णी, संदीप मोरे,  तळेकर, आनंद फुले,  सई तिकोने आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने यापूर्वी पर्यावरण जनजागृतीसाठी इंद्रायणी नदी सुधार उपक्रम, महिला बचत गटांना मोफत खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंद्रायणी थडीचा उपक्रम, रिव्हर साक्लोथॉन, स्वच्छता व वृक्ष लागवडीचे महत्व सांगण्यासाठी अवरित श्रमदान, विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना संधी देण्यासाठी मुलींचा कबड्डी व खो-खो संघ, मुला-मुलींचा कराटे संघ, भवानी तालीम व कुस्ती संघ, वारकरी सांप्रदाय व अध्यात्म क्षेत्रातील अध्यात्माचे महत्व सांगण्याच्या उद्देशाने किर्तन महोत्सव, रामायण व भागवत कथा महोत्सव असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. रविवारी (दि.५) भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील पटांगणावर आयोजित केलेल्या उपक्रमात इयत्ता ३ री ते १० वी मधील ५०० बालसंस्कार वर्ग सहभागी होणार आहेत. ते याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकलेल्या ५००  गटकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारणार आहेत. सकाळी 9वाजता या स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, प्रमुख पाहुणे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

 या उपक्रमाची माहिती देताना सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितिन मोरे म्हणाले की,या नियोजित उपक्रमात संस्थेच्या वतीने सुरु असणा-या सुमारे ५०० ‘बालसंस्कार व युवा प्रबोधन वर्ग’ तसेच परिसरातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून एकाच दिवशी – एकाचवेळी तब्बल ५०० हुन अधिक मातीचे गड-किल्ले बनवून त्याद्वारे छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांची व महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती जागतिक स्तरावर पोहचवण्याचा प्रयत्न आहे. पुणे जिल्हा हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. तसेच जिल्ह्यातील विविध किल्ले देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्व आहे. या उपक्रमात जे मातीचे गड-किल्ले उभारले जाणार आहेत त्या किल्ल्याची भौगोलिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी दर्शवणारे पोस्टर त्याठिकाणी असणार आहेत. विद्यार्थी मातीचे गड-किल्ले साकारताना किल्ल्यांचे प्रकार, वैशिष्ट्य व वेगळेपण, तसेच गडकिल्ल्यांवर असणारे विविध अवशेष याबाबत सर्व माहिती त्यांना होणार आहे. या उपक्रमासाठी विभागाच्या विशेष टीमद्वारे किल्ले कसे बनवावे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हातून उभारले जाणारे हे गड-किल्ले म्हणजे एक प्रकारे इतिहासाचा प्रत्यक्ष जागरच आहे. विद्यार्थी व युवांमध्ये छत्रपती शिवरायांचे विचार रुजविणे तसेच उपक्रमांतून गड-किल्ल्यांच्या संरक्षण – संवर्धनाचे अभियान अधिक बळकट करणे असा उद्देश या राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजनाचा आहे. गड-किल्ल्यांवर जातांना फक्त पर्यटन म्हणून न जाता प्रत्यक्ष इतिहासाला भेट देत आहोत ही भावना विद्यार्थी व युवकांमध्ये यावी, तसेच पर्यावरण पूरक पर्यटन असावे, अर्थात कचरा न करता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याला कसे जपता येईल याचेही मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे हजारो विद्यार्थी व युवकांना करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, बीड, परभणी, यासह विविध जिल्ह्यातून युवक येणार आहे. या राज्यस्तरीय युवा महोत्सवात बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग प्रमुख नितिन मोरे यांचे युवक व युवतींसाठी प्रेरणादायी व प्रबोधनपर मार्गदर्शन आयोजित केलेले आहे. कार्यक्रमाला राज्यातील विविध स्तरातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहे.

श्री गुरुपीठाद्वारे या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची नोंद विश्वविक्रमात करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश मूल्य नाही. आजपर्यंत ४९७ बालसंस्कार वर्ग व युवा वर्ग संघांनी नोंदणी केली आहे. यामध्ये दुबई, व्हिएतनाम आणि पश्चिम महाराष्ट्रातील संघाचा सहभाग आहे. उपक्रमाचे उद्‌घाटन सकाळी ९ वाजता, १० ते दुपारी १ वाजेपर्यंत किल्ले बनवणे उपक्रम होईल. दुपारी १ ते रात्री १० वा. व दुस-यास दिवशी सोमवारी (दि. ६)  सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत शिवप्रेमींसाठी किल्ले पाहण्यासाठी खुले राहिल.