भोसरीत जमिनीच्या वादातून एकाला जबर मारहाण

0
2185

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून एका इसमाला एकाच कुटुंबातील सातजणांनी मिळून जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.५) रात्री दहाच्या सुमारास भोसरीतील सर्व्हे.क्र.१७९ येथील शेत जमिनीत घडली.

रुपेश कृष्णाजा फुगे (वय ३६, रा. के.जी.फुगे चाळ, आळंदीरोड, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मारहाण करणाऱ्या भाऊसाहेब खंडू फुगे, मारुती खंडू फुगे, कृष्णाबाई खंडू फुगे, स्वाती भाऊसाहेब फुगे, रुपाली मारुती फुगे आणि इतर दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश फुगे यांची भोसरीतील सर्व्हे.क्र.१७९ येथे वडिलोपार्जित शेत जमिन आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास रुपेश हे त्यांच्या शेतातील खड्यांमध्ये माती भरण्याचे काम करत होते. यावेळी आरोपी भाऊसाहेब फुगे यांनी तेथे जाऊन रुपेश याला दमदाटी करत जबरदस्तीने काम बंद करायला लावले. तसेच भाऊसाहेब फुगे यांच्यासोबत असलेले त्यांचे कुटुंबीय मारुती फुगे, कृष्णाबाई फुगे, स्वाती फुगे, रुपाली फुगे आणि इतर दोघा जणांनी मिळून रुपेश याला हाताने मारहाण करुन जखमी केले आणि त्यांच्या आई-वडिलांना देखील मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक तांबोळी तपास करत आहेत.