भोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक

0
2391

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – खूनाचा प्रयत्न, दोरडा, जबरी चोरी या गुन्ह्यांप्रकरणी तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखेकडील खंडणी/दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.७) सिध्देश्वर पान स्टॉल चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी येथे करण्यात आली.

मंगेश सखाराम आंभोरे (वय २८, रा. संकल्प बिल्डींग, सुपे. सध्या रा. गणेश मंदिराजवळ, देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या फरारी आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे आणि भोसरी पोलीस ठाण्यात दरोडा, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गुन्हे शाखेकडील खंडणी/दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक किरण काटकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, आठ वर्षांपासून गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी मंगेश अंभोरे हा सिध्देश्वर पान स्टॉल चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी येथे उभा असून त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. यावर खंडणी/दरोडा विरोधी पथकाने तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून मंगेश याला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलीसांनी त्याची भोसरी एमआयडीसी आणि भोसरी पोलीस ठाण्यात माहिती दिली. तर या दोन्ही पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात दरोडा, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल होते. आणि या प्रकरणात तो तब्बल आठ वर्षांपासून फरार होता. पोलीसांनी मंगेशला अटक केली. तसेच त्याला पुढील कारवाईसाठी भोसरी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे तसेच खंडणी/दरोडा विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, अशोक दुधवणे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.