भोसरीत कचरा डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; वडिल गंभीर

0
868

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – भरधाव कचऱ्याच्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरुन वडिलांसोबत चाललेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. तर त्याचे वडिल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार (दि.१८) रात्री साडेदहाच्या सुमारास गोडाऊन चौक, कचरा डेपो भोसरी एमआयडीसी येथे घडली.

अर्णव शिवशंकर सोनबणे (वय ५, रा. मोशी मुळ रा. लातूर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. तर शिवशंकर सोनबणे (वय ३०, रा. मोशी मु.रा. लातूर) असे गंभीर जखमी त्याच्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी राहूल सोनबणे (वय २५, रा. मोशी मु.रा. लातूर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डंपरचालक सचिन सुदाम कांबळे (वय २८, रा. मोरेवस्ती) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जखमी शिवशंकर सोनबणे हे मुलगा अर्णव याला घेऊन त्यांची दुचाकी (क्र.एमएच/२४/बीडी/७५५९) वरुन गोडाऊन चौक, कचरा डेपो भोसरी एमआयडीसी येथून चालले होते. यावेळी भरधाव कचऱ्याचा डंपर (क्र.एमएच/१४/सीएल/१५१२) वरील चालकाने शिवशंकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी अर्णवचा मृत्यू झाला तर शिवशंकर यांची प्रकृती चिंताजणक असल्याने त्यांना मोशीतील संत ज्ञानेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे तपास करत आहेत.

दरम्यान या घटनेनंतर मयत अर्णव च्या नातेवाईकांनी पिंपरी महापालिकेच्या आयुक्तांना घेराव घातला.