भोसरीत उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये चोरी करणाऱ्या महिलेस अटक; १ लाख ९१ हजारांचे हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त

0
1658

भोसरी, दि. १८ (भोसरी) – उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये घरकाम करण्याच्या बहाण्याने मालकांची नजर चुकवून सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका महिलेला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने भोसरी परिसरातून अटक केली आहे. या महिलेकडून भोसरी आणि चतू:ऋगी या दोन पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे. तसेच तिच्याकडून एकूण १ लाख ९१ हजार ८२० रुपये किमतीचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आला आहेत.

रिटा बेंजामिन जॉन (वय ५२, रा. नॅश्नल शाळेजवळ, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या या महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी भोसरी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी पोलीस शिपाई प्रविण पाटील आणि गणेश सावंत यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये घरकाम करण्याचा बहाणा करुन रिटा जॉन हि महिला चोरी करते ती सध्या भोसरीत आहे. यावर महिला पोलीस शिपाई रुपनवर यांना सोबत घेऊन भोसरी परिसरात शोध घेऊन रिटा हिला अटक करण्यात आली. तिची कसून चौकशी केली असता तिने भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील एका घरातून २५ हजारांची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, सिंध कॉलणी औंध येथील एका घरातून १ लाख ६६ हजार ८२० रुपये किमतीचे हिरे जडीत सोन्याचे दागिने तसेच चतू:ऋगी येथे देखील चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी तिच्याकडून एकूण १ लाख ९१ हजार ८२० रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

हि कारवाई सहायक आयुक्त (गुन्हे शाखा) सतीश पाटील, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, हवालदार किशोर यादव, राजु केदारी, प्रमोद लांडे, पोलीस नाईक अमित गायकवाड, पोलीस शिपाई प्रवीण पाटील, गणेश सावंत तसेच महिला पोलीस शिपाई रुपनवर यांच्या पथकाने केली.