Pune Gramin

भोसरीतून मोबाईल, चाकणमधून मोबाईल, दुचाकी जबरदस्तीने चोरली

By PCB Author

March 31, 2022

चाकण, दि. ३१ (पीसीबी) – इंद्रायणी कॉर्नर, भोसरी येथे एका व्यावसायिकाचा मोबाईल फोन चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. तर चाकण येथे एका तरुणाचा मोबाईल फोन आणि दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली याप्रकरणी बुधवारी (दि. 30) एमआयडीसी भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संगन्ना होनाप्पा नालवरकर (वय 39, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार महादेव जाधव (वय 24, रा. घरकुल चिखली) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी इंद्रायणी कॉर्नर भोसरी येथून चालत जात असताना चोरट्यांनी त्यांच्या हातातून 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून ओंकार जाधव याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला नोटीस देण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

जयराम सोपान मुंडे (वय 25, रा. अहमदनगर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून गावी जात असताना चाकण येथे लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांची दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा 57 हजारांचा ऐवज जबरदस्तीने क्चोरून आळंदी फाट्याच्या दिशेने पोबारा केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.