भोसरीतील मोबाईल दुकानाचे पत्रे उचकटून पावनेपाच लाखांची चोरी

0
840

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – मोबाईल दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ६७ हजार २१० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री अकरा ते रविवारी (दि.१६) पहाटे चारच्या दरम्यान भोसरी आळंदी रस्ता येथील शरयु एंटरप्रायजेस या मोबाईल विक्रीच्या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकानाचे मालक विशाल प्रकाश पाटील (वय २३, रा. पसायदान सोसायटी, फ्लॅट नं.१०५, ए विंग परांदेनगर, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचे भोसरी आळंदी रस्ता येथे शरयु एंटरप्रायजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी (दि.१५) रात्री अकराच्या सुमारास दुकानाला कुलुप लावून घरी गेले असता. रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील विविध कंपन्यांचे ४५ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ६७ हजार २१० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे तपास करत आहेत.