भोसरीतील महात्मा फुले विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव

0
638

भोसरी, दि. १ (पीसीबी) – भोसरीतील महात्मा फुले विद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळविले. यापैकी दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले. पिंपरी- चिंचवड शहरात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम या वर्षी या विद्यालयाच्या नावे नोंदविला गेला. यानिमित्त गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका मंगल आहेर-गावडे यांचा भोसरीतील महात्मा फुले जागृती मंडळ संचलित महात्मा फुले विद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष निळकंठ लोंढे, नगरसेवक संतोष लोंढे, शिक्षणाधिकारी दीपक माळी, पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, शिक्षक नितीन शेजवळ, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ लोंढे, सचिव अनिल लोंढे, मुख्याध्यापक मोहन वाघुले, मुख्याध्यापिका निर्मला माळी, ज्येष्ठ पत्रकार सुनील लांडगे आदी उपस्थित होते.

मार्गदर्शक शिक्षिका मंगल आहेर-गावडे यांना पालकांनी व निळकंठ लोंढे यांनी कृतज्ञतापूर्वक निधी गोळा करून दुचाकी भेट दिली. संस्थेने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. मंगल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १५० हून अधिक विद्यार्थी व महाविद्यालयाचे २०० पेक्षा अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणि २० हून जास्त विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शिष्यवृत्ती स्पर्धेत राज्यात दोन वेळा दुसरा क्रमांक महात्मा फुले विद्यालयाने पटकावला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष निळकंठ लोंढे यांनी दिली. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शक सुरेश राऊत, राजश्री तोत्रे, मिनाक्षी चौधरी, निळकंठ दहिफळे, माधुरी जगताप या शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मकरंद आहेर यांनी केले तर बाळासाहेब लोंढे यांनी आभार मानले.