भोसरीतील मतदारांनो आपले डोळे आणि कान उघडे ठेवा; आढळराव पाटलांनी रेडझोनच्या मुद्द्याला हात घातलाय

0
3117

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आगामी निवडणूक प्रचारातील मुद्दे संसदेच्या पटलावर यावेत, या उद्देशाने पद्धतशीर डावपेच आखण्यास सुरूवात केले आहेत. पिंपरी-चिंचवडच्या प्रलंबित प्रश्नांवर गेल्या चार वर्षात कधी तरी तोंड उघडणाऱ्या आढळराव पाटलांनी संसदेत रेडझोनचा प्रश्न उपस्थित करून भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष स्वतःकडे वेधले आहे. लोकसभेच्या गेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच आगामी निवडणुकीतही याच मुद्द्याचे राजकीय भांडवल करून मतांचा जोगवा मागण्याचा त्यांचा डाव त्यातून स्पष्ट होत आहे. परंतु, सत्तेत असूनही रेडझोनचा प्रश्न सुटला नाही, तर ते काय स्पष्टीकरण देतात की भूलथापा मारतात हे पाहणे मतदारांसाठी मजेशीर ठरणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आधीच्या खेड लोकसभा मतदारसंघातून एकदा आणि मतदारसंघांच्या पुनर्ररचेनंतर तयार झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या भागातून आढळराव पाटील तीन वेळा शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये असणाऱ्या दुहीचा आढळराव पाटील यांना तीनही निवडणुकांमध्ये फायदा झाला आहे. तसेच प्रचारतंत्राची चांगलीच जाण असल्यामुळेही ते तीनही निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांपेक्षा मतदारांना नेहमी उजवे वाटले आहेत.

आढळराव पाटील हे सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले असले, तरी विधानसभा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपर्यंत शिवसेनेला ते यश मिळवून देऊ शकले नाहीत. त्यामागे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाराजांकडून मिळणारी रसद कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत तर आढळराव पाटील यांनी शिवसेनेचा अवघा एक नगरसेवक निवडून आणण्यासाठी देखील आपली राजकीय ताकद खर्ची घातली नाही. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. हे राजकीय वास्तव असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे शिरूर मतदारसंघातून हमखास विजय मिळवणारे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.

त्यामागे निवडणूक लढविण्याचे तंत्र, प्रत्यक्ष निवडणुकीवेळी त्यांच्याकडून केली जाणारी वातावरण निर्मिती तसेच अमाप खर्चाची तयारी कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. आगामी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यामुळे आढळराव पाटील यांनी या राजकीय तंत्रांचा वापर करण्यास सुरूवात केल्याचे चित्र दिसू लागले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील रेडझोनची हद्द कमी करण्याचा प्रश्न निवडणूक प्रचारात नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. याच मुद्द्यावर आढळराव पाटील यांनी सलग तीन वेळा लोकसभा लढविली आणि प्रत्येकवेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना आघाडी दिली आहे. परंतु, आजतागायत हा प्रश्न काही सुटलेला नाही.

निवडणूक प्रचारात रेडझोनचा प्रश्न सोडवण्याचे तावातावाने आश्वासन देणाऱ्या आढळराव पाटलांनी गेली चार वर्षे हा प्रश्न गाठोड्यात बांधून ठेवला होता. चार वर्षात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असला तरी, पाहिजे तेवढा प्रभावीपणे मांडताना ते कधी दिसले नाहीत. परंतु, आता त्यांनी गाठोड्यात बांधून ठेवलेला रेडझनचा प्रश्न संसदेच्या पटलावर मांडत भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे स्वतःकडे वेधून घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, हे मतदारांनी आता समजून घ्यावे.

आढळराव पाटील यांनी संसदेत रेडझोन हद्द कमी करण्याचा प्रश्न उपस्थित केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यातून त्यांना भरपूर प्रसिद्धीही मिळाली. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे गेल्या तीन लोकसभा निवडणुकांप्रमाणेच आगामी निवडणूक प्रचारातही रेडझोनच्या मुद्द्यावरून मतांचा जोगवा मागणार हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच निवडणूक प्रचाराची वातावरणनिर्मिती करण्यास सुरूवात केल्याचे मानले जात आहे. परंतु, तीन वेळा खासदार असूनही आणि सध्या सत्तेत सहभागी असूनही रेडझोनचा प्रश्न सुटला नाही, तर आढळराव पाटील त्याबाबत निवडणूक प्रचारात काय स्पष्टीकरण देतात की भूलथापा मारतात हे पाहणे मतदारांसाठी मजेशीर ठरणार आहे.