Pimpri

भोसरीतील बालाजीनगरला गुंडाचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा; भर रस्त्यात धुडगुस घालत, दहशत निर्माण करण्याचा प्रकार

By PCB Author

October 17, 2020

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – रस्त्यात तवारीने केक कापून वाढदिवस साजरा कऱण्याचे प्रकार वाढल्याने शहर पोलिसांनी त्यावर कठोरपणे बंदी घातली होती. ज्यांनी अशा प्रकारे वाढदिवस साजरे केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्या महाभागांना कोठडीत टाकण्यात आले. आता पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा हा प्रकार सुरू झाला आहे. भोसरी परिसरातील बालाजीनगरला उच्छाद घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने गेल्या आठवड्यात टेल्को रस्त्यावर तलवारीने केक कापून आपला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. विशेष म्हणजे त्यावेळी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणविणाऱ्या काही गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांचीही यावेळी उपस्थिती होती. तलवारिने केक कापतानाचे फोटो शहरातील सोशल मीडियावर व्हायरल झाले असून भोसरी पोलिसांकडेही ते पोहचले आहेत. अद्याप या प्रकरणात पोलिसांची कारवाई झालेली नाही.

पिंपरी चिंचवड शहरात भाईगिरी करणाऱ्यांनी आपले वाढदिवस मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची प्रथाच सुरू केली होती. भर रस्त्यात चारचाकी, दुचाकी उभी करायची आणि फटाक्यांच्या आतशबाजीत तलवार उंचावून फोटो सेशन करत केक कापायचा प्रकार शहरात गल्लीबोळात सुरू झाला होता. भाईगिरी करणाऱ्यांनी त्यातून दहशत निर्माण केली होती. परिसरातील त्रस्त नागरिकांनी त्याबाबत पोलिसांना तक्रार केल्यावर कोरवाई सुरू झाली. अशा टघ्या, टपोरी भाईंना पोलिसांनी त्यांचा प्रसाद दिला आणि गुन्हे दाखल केले. पोलिसांच्या कारवाईमुळे हे प्रकार शहरात बंद पडले होते ते आता पुन्हा सुरू झाले आहेत.