भोसरीतील ‘त्या’ तरुणाचा खून मोबाईलमधून गर्लफ्रेंडचे फोटो डिलीट केल्याच्या वादातून

0
5685

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – भोसरीतील वाळके मळा येथे तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृन खून केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी १२ तासात आरोपींचा छडा लावत त्यांना अटक केली. मयत तरुणाच्या मोबाईलमधील त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो डिलीट केल्याच्या वादातून दोघा आरोपींनी त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

लवकुशकुमार पांडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजकुमार अनिल गवारे (वय २१, रा. अभिनवनगर, जुनीसांगवी, मुळ.रा. बोरगे यांची रुम नं.१, बोरगे चाळ, मारुंजी, पुणे) आणि  गोपाळ मुरारी गायकवाड (वय २१, रा. पाडळेचाळ, बालेवाडी स्टेडीमजवळ, महाळुंगे, मुळ.रा. निलंगा बसस्टॅण्ड, लातुर) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२२ सप्टेंबर) भोसरीतील वाळके मळा येथील हाय टेंशन टॉवरच्या खाली एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून झाल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता मयत तरुणाच्या गळ्यावर, छातीवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने निदर्शनास आले. तसेच प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचे आढळून आले. यामुळे त्या तरुणाचा खून करुन त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी फेकून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून बँकेची कॅश पावती मिळाली. पोलिसांनी त्या आधारे मृताचा भाऊ संदीपकुमार पांडे याचा शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता मयत तरुण त्याचा भाऊ लवकुशकुमार पांडे  असून तो दोन दिवसांपासून मित्रासोबत बाहेर गेल्याचे समजले.

यावर पोलिसांनी त्यांच्या खबऱ्या मार्फत आरोपी राजकुमार आणि त्याचा साथीदार गोपाळ याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच मयत लवकुशकुमार याच्या मोबाईलमधून त्या दोघांनी फोटो डिलीट केले होते. यामुळे  लवकुशकुमार याचा राजकुमार आणि गोपाळसोबत वाद झाला होता. या वादातून  राजकुमार आणि त्याचा साथीदार गोपाळ याने धारदार शस्त्राने वार करुन लवकुशकुमारचा खून केला. पोलिसांनी दोघांवरही ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहे.