भोसरीतील ‘त्या’ ज्यूस सेंटर चालकाच्या खूनप्रकरणी भुसावळ येथून चौघेजण ताब्यात

0
1042

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – भोसरीतील गावजत्रा मैदानावर आज (रविवार) सकाळी ज्यूस सेंटर चालक  सनाउल हक (वय ३२, रा. भोसरी) याचा धारदार शस्त्राने वार करुन खून झाल्याचे समोर आले होते. पोलिसांनी या प्रकरणातील चार संशयित आरोपींना भुसावळ येथून तातडीने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनाउल आणि हबीबूर रहमान यांनी काही दिवसांपूर्वी रुबेल शेख नावाच्या इसमाकडून तो चालवत असलेले ज्युस सेंटर अधिक भाडे देऊन भागीदारीत चालवण्यासाठी घेतला होता. मात्र, काही दिवसांनी त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातूनच सनाउलचा खून झाल्याचा संशय भोसरी पोलिसांना आहे. शनिवारी रात्री उशिरा सनाउलला एकाने भोसरीच्या गावजत्रा मैदानावर बोलवून घेतले त्याठिकाणी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर चौघांनी मिळून सनाउलला लोखंडी रॉड आणि कोयत्याने डोक्यावर वार करुन त्याचा खून केला. घटनेनंतर चौघेही आरोपी पसार झाले. या चौघांना भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले असून भोसरी पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी भुसावळला रवाना झाले आहे.