Bhosari

भोसरीतील ‘डब्ल्यू.टी.ई.’ कंपनीच्यावतीने वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती

By PCB Author

July 11, 2018

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – पाणी व सांडपाणी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील नामांकित ‘डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या वतीने यावर्षी ‘पर्यावरण वारी’ उपक्रम हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच, वारीदरम्यान वारक-यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश असलेल्या छत्री, टी-शर्ट वाटपही करण्यात आले. विशेष म्हणजे, कंपनीतील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांनी उत्साहात वारीमध्ये सहभाग दर्शवला. तसेच, पालखी मार्गावर वारी पुढे गेल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आणि कृतीशील पुढाकार घेणा-या या कंपनीचा आदर्श उद्योगनगरीतील मोठ्या कंपन्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान दिघीतील, मॅगझीन चौकात कंपनीच्यावतीने स्वागत मंडप उभारण्यात आला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ‘पर्यावरण वारी’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वारक-यांना उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. डब्लू. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. कंपनीचे संचालक अशोक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विनोद भोळे, गुरुप्रसाद तेलकर, दर्शना देशपांडे, प्राजक्ता पाटील, सुभाष धोंडकर, सतीश पाटील, युवराज शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.