भोसरीतील कंपनीची गोपनीय माहिती ‘लीक’ केल्याने कामगारांवर गुन्हा

0
511

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – कंपनीच्या उत्पादनाबाबतची गोपनीय माहिती लीक करुन त्याचा गैरवापर करत कंपनीला नुकसान पोहचवल्याने भोसरी एमआयडीसी येथील कंपनीत काम करणाऱ्या चौघा कामगारांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी २०१६ ते २०१८ दरम्यान कंपनीच्या मालकांनी दिलेली गोपनीय माहिती लीक केली होती.

याप्रकरणी कंपनीचे मालक दीपक नारायण पतंगे (वय ६०, रा. एमआयडीसी, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यानुसार, अभिजित पाटील, विजय ढवळे, संदीपान खरात आणि प्रमोदसिंग राजपूत या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पतंगे यांची भोसरी एमआयडीसी येथे कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये आरोपी अभिजित, विजय, संदीपान आणि प्रमोदसिंग हे चौघेही काम करतात. पतंगे आणि आरोपींचे चांगले संबंध असल्याने त्यांनी कंपनीच्या उत्पादनाबाबतची गोपनीय माहिती आरोपींना दिली होती. मात्र आरोपींनी २०१६ ते २०१८ दरम्यान त्या माहितीचा गैरवापर करुन कंपनीला नुकसान पोहचवले. ही बाब पतंगे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.