भेसळयुक्त दूध विक्री प्रकरणी FDA ची मोठी कारवाई; ‘अशी’ व्हायची दूधामध्ये भेसळ

0
346

सोलापूर, दि.०२ (पीसीबी) : गाईच्या दुधात लीना नीळ घालून ते दूध म्हशीच्या दुधासारखा घट्ट करून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार देवळे (ता. सांगोला) येथे उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने या दूध संकलन केंद्रावर छापा टाकून ही कारवाई केली आहे. सदर केंद्राचा परवाना रद्द करून दुग्ध व्यावसायिकासह त्याच्या साथिदारावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी मे.विठाई मिल्क फूड प्रॉडक्ट्सचे रणजित व्हनमाने यांच्यासह त्यांच्याकडून भेसळयुक्त दुध घेऊन विक्री करणारे मे. चैतन्य संकलन केंद्र, पंढरपूर, तसेच व्हे पावडर पुरवठा करणारे मे. श्री बालाजी ट्रेडर्स, (जयसिंगपूर ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) यांच्याविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दूध भेसळीच्या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार अन्न व औषध प्रशासनाने देवळे येथील रणजित शिवाजी व्हनमाने यांच्या.विठाई मिल्क फूड प्रॉडक्ट्स, या दुकानावर 23 सप्टेबर रोजी छापा टाकून तपासणी केली. यावेळी पेढीत दुध भेसळीकरीता लिना निळ (अपमिश्रक) या कंपनीच्या अर्धा लिटरचे 10 सील बंद बॉटल आढळून आल्या. तसेच सदर पेढीच्या बाजूला असलेल्या युवराज भगवान अलदार यांच्या घराची झडती घेतली असता त्याठिकाणी एका खोलीमध्ये व्हे पावडर (अपमिश्रक) अमूल ब्रॅण्डचे 25 किलोच्या 3 बॅगा आढळल्या. निळीबाबत रणजित व्हनमानेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर निळ ही गायीच्या दुधात टाकून गायीच्या दुधास म्हशीच्या दुधासारखा पांढरा रंग करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले.

यावरुन मे.विठाई मिल्क फूड प्रॉडक्ट्स दुकानात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर ठिकाणाहून गायीचे दूध आणि या दुधापासून बनवलेले पदार्थ, पावडर व लिना निळ या अपमिश्रकाचे नमुने विश्लेषणास घेऊन उर्वरित 8 हजाराचे 298 लीटर गाईचे दूध नष्ट केले. यावेळी 12 हजार किमतीचे व्हे पावडर, 74 किलो निळ बॉटल असे एकूण 20 हजार 660 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

अन्‍न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त परिमल सिंग, पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई सोलापूरचे सहायक आयुक्‍त प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता विभागातील अन्‍न सुरक्षा अधिकारी ज्ञानेश्वर महाले, अरविंद खडके, राम मुंडे, मिलिंद महागंडे, अनिल पवार, रोहन शहा, डॉ. मंगेश लवटे, महेश मासाळ, गणेश कदम व सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, उमेश भुसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.