Banner News

भुशी डॅमच्या पायऱ्यांवरून जलप्रपात; पर्यटकांना बंदी  

By PCB Author

July 28, 2019

लोणावळा, दि.२८ (पीसीबी) –  लोणावळा, मावळ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसामुळे भुशी डॅम धरणाच्या पायऱ्यांवरून  जोरात पाणी वाहत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव  धरणावर पर्यटकांना जाण्यास  बंदी घालण्यात आली आहे.  तसेच धरणावर लोणावळा शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

लोणावळा व मावळ  परिसरात  पावसाचा जोर  अद्याप कायम आहे. पावसामुळे आज (रविवार) लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांची  संख्या  रोडावली आहे.  भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.  पायऱ्यांवरून  जोरात पाणी वाहत  आहे. पर्यटकांना धरणस्थळावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी परिस्थितीचा आढावा घेऊन यावे. तसेच  स्थानिक नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर  पडू नये, अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.  शहरात पूर परिस्थिती  निर्माण झाल्यास  प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.  नगरपरिषदेचे आपत्कालिन पथके शहरात तैनात करण्यात आली आहेत.