‘भुताची भीती वाटते म्हणून माहिती देऊ शकत नाही’; वैद्यकीय महाविद्यालयाचचं RTI कार्यकर्त्यांना उत्तर

0
379

 -काय आहे ‘हे’ भुताटकी प्रकरण…

मध्यप्रदेश, दि.२३ (पीसीबी) : ग्वाल्हेरमधल्या गजरा राजा वैद्यकीय महाविद्यालयाने मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना दिलेल्या उत्तराने हशा पिकला आहे. या महाविद्यालयाने माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास नकार दिला आहे. ‘भुताची भीती वाटत असल्याने आपण ही माहिती देऊ शकत नाही’, असं प्रशासनाने या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कळवलं आहे.

या महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या अॅडमिशनमध्ये काहीतरी गोंधळ असल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण खणून काढण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ज्या विद्यार्थ्यांबाबत त्यांना संशय वाटतोय त्यांच्या अधिवासाच्या दाखल्यासंदर्भात माहिती मागवली होती. या विद्यार्थ्यांनी खोट्या डोमिसाईल सर्टिफिकेटच्या आधारे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याचा संशय आहे. मात्र ही माहिती देण्यास महाविद्यालय प्रशासनाने नकार दिला आहे.

पंकज जैन नावाच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने या प्रकाराबाबत माहिती देताना सांगितले की सुरुवातीला महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की जो लिपीक कागदपत्रांची खोली सांभाळतो त्याला सीबीआयने अटक केली आहे. कालांतराने प्रशासनाने सांगितलं की या लिपीकाने आत्महत्या केली आहे. ज्या खोलीत सगळी कागदपत्रे ठेवली आहेत, त्याच खोलीत या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आणि त्याचं भूत तिथे वावरत असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं. या भूताची भीती वाटत असल्याने त्या खोलीत कोणी जाण्यास धजावत नाही, ज्यामुळे मागवलेली माहिती देऊ शकत नाही असं प्रशासनाने कळवलं आहे. जैन यांनी सांगितलं की ही कागदपत्रं मिळवण्यासाठी ते 3 वर्ष प्रयत्न करत आहेत.

जैन यांनी अशीही शंका आहे की, या महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची कागदपत्रे आणि संबंधित तपशील गहाळ झालेला आहे. ही शंका खरी आहे का खोटी हे तपासण्यासाठी जैन यांनी 1994 साली एमबीबीएसचं शिक्षण घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा तपशील मागवला होता. हा तपशील सापडत नसल्याचं प्रशासनानं उत्तर दिलं होतं. जवळपास 3 वर्ष या माहितीसाठी पाठपुरावा केल्यानंतर जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागितली. त्यांच्यासमोर चारवेळा सुनावणी झाल्यानंतरही जैन यांना मागितलेली माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिलेली नाही. ही माहिती गहाळ झाली असल्यास ही एक मोठी चिंतेची बाब ठरू शकते असं जैन यांचं म्हणणं आहे. ही कागदपत्रे न सापडल्यास जे डॉक्टर शिकून बाहेर पडलेले आहेत, त्यांची वैद्यकीय पात्रता तपासण्यासाठी काहीच पुरावा उरणार नाही अशी भीतीही जैन यांनी वर्तवली आहे.