‘भीमा-कोरेगाव’ ला जाणारच; आम्हांला कोणी रोखू शकत नाही- प्रकाश आंबेडकर

0
793

नगर, दि. २१ (पीसीबी) – भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत्या १ जानेवारी रोजी आम्ही जाणार असून आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी दिली जाणार नाही असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसापूर्वीच म्हटले होते. आज अहमदनगर दौऱ्यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी दिलीप कांबळे यांचे नाव न घेता आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असं म्हटलं आहे. आम्हाला रोखण्याची भाषा करणारा सामाजिक न्याय राज्यमंत्री हा बिनडोक आहे. किंबहुना राखीव जागांवरील भुंकणारी कुत्री आहे, त्यांना जे सांगितले ते तेवढेच कामं करत असतात, अशी टीकाही आंबेडकरांनी कांबळे यांच्यावर केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्दांवर आपली मते व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने ओबीसी समाज अस्वस्थ आहे. निवडणूक काळात मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडण होण्याची भीतीही त्यांनी यावेळी वर्तवली, मराठ्यांनी ओबीसीची आधीची २७ टक्के व आता १६ टक्के आरक्षणावर कब्जा केल्याची भावना निर्माण झाली आहे. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास ठरवणारा गायकवाड समितीचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.