Pune

भीमा कोरेगाव प्रकरणातील ‘ते’ पाच जण आणखी चार आठवडे नजरकैदेतच राहणार – सर्वोच्च न्यायालय

By PCB Author

September 28, 2018

पुणे, दि. २८ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयाकडून पुणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस ए. एम. खानविलकर आणि जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने यावर २-१ अशा बहुमताने निर्णय दिला. जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांनी महाराष्ट्र पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर तीव्र आक्षेप नोंदवला. अटक ही दुर्दैवी असून मीडिया ट्रायल असल्याचे दिसून येते, असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढले.

तपास यंत्रणांनी कशाचा तपास करायचा हे आरोपी ठरवू शकत नाहीत. ही अटक राजकीयदृष्ट्या प्रेरित दिसत नाही, असं म्हणत जस्टिस ए. एम. खानविलकर यांनी पोलिसांना पुढील तपासाची परवानगी दिली आणि याचिकाकर्त्यांची विशेष तपास पथकाची (एसआयटी) मागणीही फेटाळून लावली.