“भीमा कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही”

0
361

सिंधुदुर्ग,दि.१८(पीसीबी) – एल्गार परिषद हा विषय वेगळा आहे. केंद्राने एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे. मात्र भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  “एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. दलित बांधवांशी संबंधित जो विषय आहे तो भीमा कोरेगावचा आहे. या प्रकरणाचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही”, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.ते सिंधुदुर्गात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, नीट लक्षात घ्या की एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेगळे विषय आहेत. माझ्या दलित बांधवाचा जो विषय आहे तो भीमा कोरेगावबाबत आहे आणि भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तो केंद्राकडे देणार नाही. भीमा कोरेगावमध्ये दलित बांधवांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे, त्याच्यात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी दलितांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे. तपास केंद्र सरकारने जो आपल्याकडून काढून घेतला आहे तो एल्गारचा आहे, भीमा कोरेगावचा नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका. मी पुन्हा सांगतो, एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच केंद्र सरकारने या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादविवाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते.