Maharashtra

 भीती वाटत असेल, तर निवडणूक लढवू नका; उध्दव ठाकरेंकडून खासदारांची कानउघडणी

By PCB Author

January 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युती नाही झाली, तर आगामी लोकसभा लढवणार नसल्याची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी खडेबोल सुनावत कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे.   

ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना सुनावले आहे. ‘मातोश्री’वर बोलावून या खासदारांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांकडून  मिळत आहे.  त्यामुळे भाजप-शिवसेना यांची  युती होण्याची शक्यता  धुसर असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना –भाजप युती होणार नसल्याच्या शक्यतेने  शिवसेनेच्या खासदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर  लढल्यास शिवसेनेची वाट खडतर असेल, अशी धास्ती खासदारांनी घेतली आहे. त्यामुळे युती न झाल्यास लोकसभा लढणार नाही, असा पवित्रा ५ खासदारांनी घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पक्षप्रमुखांनी   या खासदारांना ‘मातोश्री’ वर  बोलावून कानउघाडणी केल्याचे समजते.