Maharashtra

भिंवडीत कार्यालयासाठी वीज चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाला अटक  

By PCB Author

January 05, 2019

भिवंडी, दि. ५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासाठी वीज चोरी केल्याप्रकरणी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा युवक अध्यक्षाला आज (शनिवार) अटक करण्यात आली आहे. हारुन खान असे या नेत्याचे नाव आहे. हारुन याने न्यू कणेरी येथील कार्यालयासाठी वीजेची चोरी केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

हारुन हा त्याच्या कार्यालयात मीटर नसलेल्या वीजेची जोडणी वापरतो. त्याने आतापर्यंत ९० हजार रुपयांची वीजेची चोरी केली आहे. दंड न भरल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

टोरंट पॉवर कंपनीने हारुन याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. कंपनीच्या तक्रारीनुसार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनुसार  त्याला अटक करण्यात आली.