भाविक पितायेत नदीचं दूषित पाणी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना केली मदतीची मागणी

0
164

पुणे ,दि.०३ (पीसीबी) -: आषाढी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची अलंकापुरीत वर्दळ सुरू झाली आहे. दुसरीकडे इंद्रायणी नदी पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इंद्रायणी नदीचे पाणी प्रचंड प्रदूषित झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय याच प्रदूषित पाण्यात वारकरी स्नान करतात. तसेच इंद्रायणी नदी पवित्र म्हणून अनेक भाविक या नदीचे केमिकल युक्त पाणी देखील पिताना पहायला मिळतात आहेत. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. प्रशासनाकडून देखील याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अलंकापुरीतील इंद्रायणीला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन देऊन, या इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.

इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे.दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे भाविकांना याच पाण्यात आंघोळ करावी लागते. इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी पिंपरी-चिंचवड मनपा, सांडपाणी नदीत सोडणारी गावे, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र, संबंधितांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यासर्व गोष्टीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जातीने लक्ष घालावे अशी विठ्ठल शिंदे यांनी विनंती केली.

यावेळी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, शिरीष कारेकर, सुनील वाघमारे आणि जनार्दन पितळे यांनी यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा केली यावेळी अजित पवार लगेच जिल्हाधिकारी देशमुख यांना फोन करुन इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी लवकरात लवकर बैठक बोलावली असे सांगितले.