भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थिनीने मिसळले मध्यान्ह भोजनात विष

0
908

देवरिया, दि. १९ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यामधील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका सातवी वर्गातील विद्यार्थिनीने भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात विष मिसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी (दि.१८) घडली.

बनकटा पोलिसांनी विद्यार्थिनीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे. तसेच या कटात अजून कोणाचा सहभाग होता का याचा देखील तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला जेवणात विष मिसळल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारीनंतर बनकटा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. विद्यार्थ्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी विद्यार्थिनीने मध्यान्ह भोजनात विष मिसळले होते. तिसरीत शिकणाऱ्या तिच्या भावाची २ एप्रिल रोजी पाचवीतील एका विद्यार्थ्याने हत्या केली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी तिने हा कट रचला होता अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.