भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर खुनी हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक

0
287

औध, दि. २१ (पीसीबी) – औंध परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा भर चौकात कु-हाडीने वार करून खून केला. खून झालेल्या गुन्हेगाराच्या भावाने दुस-या दिवशी त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका तरुणावर खुनी हल्ला केला. यातील चार जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने अवघ्या पाच तासात अटक केली आहे.

आकाश लक्ष्मीकांत वैरागर (वय 23), शुभम अनिल घाडगे (वय 22), शिवानंद बाळासाहेब पवार (वय 23), पुष्कर बाळासाहेब पवार (वय 23, सर्व रा. औंध गाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत दिलीप दीक्षित (वय 22) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर क्षितीज लक्ष्मीकांत वैरागर (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 19) सायंकाळी औंध परिसरात दहशत असलेल्या कुख्यात रावण टोळीशी संबंध असलेला गुंड क्षितीज वैरागर याचा सराईत गुन्हेगार अनिकेत दिलीप दिक्षित (वय 23, रा. पोलीस लाईन, औंध) याने भर चौकात कु-हाडीने वार करून निर्घुणपणे खून केला. चतुश्रुंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून अनिकेत दीक्षित याला अटक केली.
मयत क्षितीज वैरागर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ आकाश वैरागर याने आरोपी अनिकेत याचा सख्खा भाऊ प्रशांत याच्यावर स्पायसर कॉलेज, औंध येथे मंगळवारी (दि. 20) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खुनी हल्ला केला.

खुनी हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेले. सुरुवातीला खून आणि त्यानंतर खुनाचा प्रयत्न यामुळे औंध परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस हवालदार प्रवीण दळे यांना माहिती मिळाली की, खुनी हल्ला करून पसार झालेले चार हल्लेखोर पिंपळे निलख येथे नदी पात्राजवळ लपून बसले आहेत.

पोलिसांनी चारही हल्लेखोरांना बळाचा वापर करून अटक केली. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खुनी हल्ला केल्याचे आकाश वैरागर याने सांगितले. चारही आरोपींना पुढील तपासासाठी चतुश्रुंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहाय्यक पोलीस फौजदार धर्मराज आवटे, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, संजय गवारे, नारायण जाधव, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, गोविंद चव्हाण, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.