भारत सरकारसोबत काम करतो, कोणत्याही पक्षासाठी नाही ; ‘डासू’चे राहुल गांधींना खडे बोल

1402

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेसच्या सरकारसोबतही आम्ही काम केले आहे.  १९५३ मध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना आमच्या कंपनीने भारताशी पहिल्यांदा करार केला होता. आम्ही भारत सरकारसोबत काम करतो. कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही,  अशा शब्दांत ‘डासू’ या कंपनीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  एरिक त्रपिएर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले. रिलायन्स या कंपनीची निवडही आम्हीच केल्याचा खुलासा त्यांनी  केला.

‘डासू’या कंपनीने अनिल अंबानींच्या कंपनीला २८४ कोटी रुपये दिले. यातूनच अनिल अंबानी यांनी नागपूरमध्ये जमीन विकत घेतल्याचा आरोप  राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपांना एरिक त्रपिएर यांनी आज (मंगळवारी) एका वृत्तसंस्थेशी बोलताना उत्तर दिले.

एरिक पुढे म्हणाले की, आम्ही भारतात काँग्रेसचे सरकार असतानाही करार केलेले आहेत. राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे मी दुखावलो आहे.  आम्ही कोणत्याही पक्षासोबत काम केले नसून भारतासाठी काम केले. भारताच्या हवाई दलाला आम्ही शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला.  मी खोटे बोलत नाही. मी कंपनीचा सीईओ असल्याने माझ्या प्रतिष्ठेत ते बसत नाही, मी राफेल संदर्भातील माहिती यापूर्वीही दिली आहे, असे त्यांनी सांगितले.