‘भारत माता की जय’ असा जयघोष करणे म्हणजे देश प्रेम नाही – उपराष्ट्रपती

597

नवी दिल्ली, दि.१६ (पीसीबी) – फक्त ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’ असा जयघोष करणे म्हणजे देशप्रेम नाही. प्रत्येकाने स्वत:चे काम प्रामाणिकपणे केले तर ते खरे देशप्रेम ठरते, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. भारतात गुरुची जागा गुगल कधीच घेऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे गुरुवारी मुंबईत होते. जमनालाल बजाज वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते उपस्थित होते. या प्रसंगी नायडू म्हणाले, फक्त ‘भारत माता की जय’ बोलणे किंवा चित्रपट पाहून आल्यावर सिनेमागृहाबाहेर जय हिंदच्या घोषणा देणे म्हणजे देशप्रेम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मते देशप्रेम म्हणजे प्रत्येकाने स्वत:चे काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करणे हे आहे. भारत माता की जय म्हणजे देशातील १३० कोटी जनतेचा विकास करणे. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा हाच खरा अर्थ आहे, असे त्यांनी सांगितले.

नायडू यांनी भाषणात ‘स्वदेशी’वरही भर दिला. परकीय गुंतवणुकीच्या काळात आपण देशातील छोट्या उद्योजकांनाही मदत केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आधी एकत्रित कुटुंबपद्धती होती. आता देशात विभक्त कुटुंबपद्धती वाढली आहे. यामुळे समाजाची पिछेहाट होत आहे. गुरुची जागा गुगल कधीच घेऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.