भारत पुराव्याशिवाय आम्हाला दोष देतोय- पाकिस्तान

0
675

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाची हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. पाकिस्ताननेही या हल्ल्याचा निषेध करताना हल्ल्याशी संबंधित आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. हल्ल्यानंतर पाक परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध नोंदवत भारताने आणि भारतातील प्रसारमाध्यमांनी पुराव्याविनाच पाकला लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. 

पाकिस्तानने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ‘भारतव्याप्त काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला हल्ला हा चिंतेचा विषय आहे. जगभरात कुठेही झालेल्या हिंसेचा आम्ही नेहमीच निषेध केला आहे. याबरोबरच कोणताही तपास न करताच या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध जोडणारी भारतीय प्रसारमाध्यमे आणि भारत सरकारच्या आरोपांचे आम्ही खंडन करत आहोत.’

या हल्ल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मद आणि मसूद अजहर यांच्यावर प्रतिबंध लावण्याची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वच सदस्यांनी मसूद अजहर याला दहशतवादी घोषित करण्याबरोबरच त्याच्या मुसक्या आवळण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करावे असे आवाहनही भारताने केला आहे.