Sports

भारत पुढील वर्षी इंग्लंडमध्ये खेळणार एक मात्र कसोटी सामना

By PCB Author

September 25, 2021

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : भारत आणि इंग्लंड क्रिकेट मंडळां दरम्यान पुढील वर्षीच्या मोसमात एकमात्र कसोटी सामना खेळण्याचे निश्चित झाले आहे. यावर्षीच्या मालिकेतील पाचवा सामना कोविड १९च्या भितीने रद्द करण्यात आला होता. त्याला पर्याय म्हणून हा एकमेव सामना खेळवला जाणार आहे.

दोन्ही संघांदरम्यान कसोटी सामना होणार असला, तरी तो स्वतंत्र एकमात्र कसोटी सामना असेल, की याचवर्षी रद्द झालेल्या मालिकेतील एक भाग असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी देखील हा क्रिकेट मुत्सदेगिरीचा एक भाग असेल यात शंका नाही. यामुळे एकत इंग्लंड क्रिकेट मंडळाला या वर्षी झालेले आर्थिक नुकसान भरू काढता येईल. त्याचबरोबर पाचवा सामना रद्द करताना किंवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेताना दोन्ही क्रिकेट संघटनांना कराव्या लागलेल्या त्यागाच्या गोष्टी आणि जबाबदारीची जाणीव कुणी घ्यायची याबाबत आणी मतभेद टाळता येतील.

या कसोटी सामन्याची भरपाई करण्याच्या चर्चेत आधी कसोटीऐवजी दोन टी २० सामने खेळविण्याचे ठरवले जात होते. त्या वेळे भारत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये असणार आहे. त्यामुळे दोन टी २० सामन्यांसाठी भारतीय संघाला थांबवता येऊ शकते. पण, पुढे जाऊन कसोटी सामन्यासाठी पाच दिवसांची जागा मिळत असल्याचे लक्षात आल्यावर ही टी २० सामन्यांची कल्पना मागे पडली. सुत्रांच्या म्हणण्यानुसार या वर्षी अर्धवट राहिलेल्या मालिकेचाच हा एक भाग असेल अशी चर्चा आहे. या मालिकेत भारत २-१ असे आघाडीवर आहे.