भारत-पाकने चर्चा करुन तोडगा काढावा; चीनच्या नेतृत्वाखालील एससीओ चा सल्ला

0
419

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांवर दोन्ही देशांनी परस्परांशी चर्चा करुन मार्ग काढावा. संघटनेमध्ये शत्रूत्वाची भावना पसरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन चीनच्या नेतृत्वाखालील शांघाय सहकार्य परिषदेने केले आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने कटिबद्ध असले पाहिजे. अन्यथा एससीओमध्ये सहभागी होणे दोन्ही देशांना कठीण होऊन बसेल असे एससीओ संघटनेचे नवनियुक्त सरचिटणीस व्लादिमीर नोरोव्ह यांनी सांगितले.

दहशतवाद आणि ठराविक दहशतवाद्यांबद्दल भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये असलेल्या मतभेदांवर नोरोव्ह यांनी भाष्य केले नाही. बऱ्याचवर्षाच्या चर्चेनंतर २०१७ साली भारत आणि पाकिस्तानचा एससीओ देशाच्या संघटनेमध्ये समावेश करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमध्ये जुने वैर आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठया प्रमाणावर लष्करी तणाव वाढला होता. त्यामुळे एससीओ परिषदेत दोन्ही देश मतभेद बाजूला ठेऊन सहभागी होणार आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला.

पाकिस्तान पृरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणला. ज्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर फक्त चीनमुळे मसूद अझहरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होऊ शकला नाही. चीनने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव हाणून पाडला.