भारतीय संस्कृती, देशाचा दैदिप्यमान इतिहास स्मरण करण्यासाठी “आझादी का अमृत महोत्सव” या उत्सवात सहभागी व्हा – महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे आवाहन

0
160

– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. १ ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महोत्सवाचे आयोजन

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : प्रगतीशील भारताची ७५ वर्षे, भारत, भारतीय नागरिक, भारतीय संस्कृती आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचे विविध क्षेत्रांमधील यश यांचे स्मरण व्हावे, यासाठी भारत सरकारच्या वतीने “आझादी का अमृत महोत्सव” हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव भारतीय नागरिकांना समर्पित करण्यात आला असून भारतीय नागरिकांच्या योगदानामुळेच भारत आपल्या दीर्घकाळाच्या प्रवासामध्ये हा महत्त्वाचा टप्पा गाठू शकला आहे. या निमीत्ताने “आझादी का अमृत महोत्सव” हा कार्यक्रम देशातील नागरिकांसाठी सलग ७५ तास विविध उपक्रमांच्या माध्यमातून दि.२८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे, शहरातील नागरिकांनी भारतीय संस्कृती, देशाचा दैदिप्यमान इतिहास स्मरण करण्यासाठी “आझादी का अमृत महोत्सव” या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी ‍ चिंचवड महानगरपालिका महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, मा. स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, स्थायी समिती सदस्य सुजाता पालांडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, महोत्सव समन्वय अधिकारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडून प्राप्त सुचनानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये दि.०१ ते ०३ ऑक्टोंबर २०२१ (तीन ‍दिवस) सलग ७५ तास “आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेचे विविध विभाग आणि अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रिय कार्यालयांमार्फत शहरातील नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये, सायक्लोथॉन, वॉकथॉन, रनथॉन, रक्तदान शिबीर, अवयव दान, आरोग्य तपासणी शिबीर (ज्येष्ठ नागरिक), पथनाटय, कथाकथन, संगित संध्या (ऑर्केस्ट्रा), चित्रकला व निबंध स्पर्धा, संगीत स्पर्धा, योग सत्र/ झुम्बा, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, कौशल्य विकास, महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण, वॉल पेंटिंग, प्लेस मेकिंग, जलसंवर्धन जनजागृती, वेबीनार आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. दि. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७:३० वाजता कार्यक्रमाला सूरूवात होवून दि. ०४ ऑक्टोबर २०२१ सकाळी ११ वा. समारोप होणार आहे.

सदर कार्यक्रमामध्ये शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदींचा सहभाग राहणार असून राज्य शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम व सूचनांचे पालन व एकाच ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी टाळून कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. अशी माहिती सह मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.