भारतीय संघ आमच्यापेक्षा सरस; सर्फराज अहमदची कबुली

0
601

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – आशिया कपमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये भारताकडून दणदणीत पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा कप्तान सर्फराज अहमदनं भारतीय संघ पाकपेक्षा उत्कृष्ट असल्याची कबुली दिली आहे. आशिया कपमध्ये रविवारच्या सामन्यात पाकिस्ताननं सात गडी गमावून २३७ धावा केल्या तर आधीच्या सामन्यात पाकने सर्वबाद १६२ धावा केल्या. पाकिस्तानच्या १७ फलंदाजांना भारतानं बाद केलं, तर भारताचे मात्र अवघे तीन फलंदाज बाद झाले. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिनही आघाड्यांवर भारतानं पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं असून सोमवारी पाकिस्तानचा कप्तान सर्फराज अहमद यानं भारतीय संघ पाकपेक्षा वरचढ असल्याचं मान्य केलं आहे.

रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनी शतकं झळकावत रविवारचा सामना पाकिस्तानला कुठल्याही प्रकारची संधी न देता आरामात जिंकला आणि स्पर्धेमध्ये वर्चस्व राखले. रविवारी शोएब मलिक ७८ धावा व सर्फराज अहमद ४४ धावा वगळता अन्य कुठल्याही पाकिस्तानी फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. आता पाकिस्तानचा बांग्लादेशशी मुकाबला असून यामध्ये जिंकणारा संघ भारताशी अंतिम सामन्यात खेळणार आहे.

“त्यांची कामगिरी चांगली आहे, आम्ही त्या दर्जापाशी पोचू शकलेलो नाही. परंतु अंतिम सामन्यापर्यंत आम्हीही त्याच दर्जाची कामगिरी करू. पुढील सामना आमच्यासाठी ‘जिंका अथवा मरा’ असा असून आम्ही या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करू,” सर्फराज म्हणाला. रविवारच्या सामन्यात पाकिस्तानला सुमारे ३० धावा कमी पडल्या असं मत सर्फराजनं व्यक्त केलं आहे. तसंच रोहितला १४ व ८१ धावांवर मिळालेली जीवदानं महागात पडल्याचंही त्यानं कबूल केलं आहे.

“जर आम्ही झेल सोडत राहिलो तर सामने जिंकणं कठीण आहे. आम्ही खरंतर क्षेत्ररक्षणाचा चांगलाच सराव केला आहे. परंतु काय चुकतंय तेच कळत नाही,” अशा शब्दांमध्ये सर्फराजनं खंत व्यक्त केली आहे. रोहित व शिखरसारख्या कसलेल्या फलंदाजांना लवकर बाद करता आलं नाही, व त्यांचे झेल सोडले तर सामना जिंकणं कठीण आहे, अशी भावना त्यानं व्यक्त केली आहे.