Maharashtra

भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी कलाकारांशी काम करू नये – मनसे

By PCB Author

February 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा पाकिस्तान कलाकारांचा धिक्कार केला आहे. भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा मनसे सिने-विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

अमेय खोपकर म्हणाले की, देशातील काही म्युझिक कंपन्या पाकिस्तानी गायकांचे अल्बम्स बनवत आहेत. तसेच पाकिस्तानात गाणी रेकॉर्ड करून भारतात पाठविले जात आहेत आणि त्या गाण्यांवर भारतात प्रक्रिया होते व अल्बम्स निर्मिती केली जाते. मात्र, आता कंपन्यांनी ही कामे ताबडतोब बंद करावीत, अन्यथा त्यांचा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल, अशा इशारा खोपकर यांनी दिला आहे.

जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४८ जवान शाहिद झाले. तर २० जवान जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे.