भारतीय महिलांची अंतिम फेरीसाठी धडपड

0
220

टोकियो, दि.२९ (पीसीबी) : अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या भारतीय नेमबाजांनी आज २५ मीटर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठण्यासाठी धडपड केली. पण, यात त्या फार यशस्वी झाल्या असे म्हणता येणार नाही. पात्रतेच्या पहिल्या फेरीनंतर मनू पाचव्या आणि राही २५व्या स्थानावर आहे.

मनूने पात्रतेच्या पहिल्या दिवशी ३०० पैकी २९२, तर राहीने २८७ गुण घेतले आहेत. आता दुसरी फेरी रॅपिड फायर उद्या सकाळी होईल. तेव्हा दोघींना आपला नेम अधिक अचूक ठेवावा लागेल.

माजी विश्व विजेती झोराना अरुनोविच ही ४४ खेळाडूंमध्ये २९६ गुणांसह आघाडीवर आहे. ग्रीसची गतविजेती अॅना कोराकाकी १९४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतरच्या क्रमांकासाठी इतकी चुरस आहे की ११ नेमबाज २९२ गुणांवर आहेत. त्यामुळे उद्या मनूला अधिक अचूक कामगिरी दाखवावी लागणार आहे. यापूर्वी १० मीटर पिस्तुल प्रकारातही मनूचे इतकेच गुण झाले होते.

नेमबाजीत आता भारताचे अजून दोन प्रकार बाकी आहेत. एकूण चार नेमबाज आपले कौशल्य पणाला लावतील. यामध्ये तेजस्विनी सावंत, अंजुम मौदगिल, ऐश्वर्य प्रताप सिंग आणि संजीव राजपूत सहभागी होतील.