भारतीय कबड्डी महासंघाच्या निवडणुकीतून अजित पवारांची माघार

0
308

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. राज्याची निवडणूक जवळ आल्याने निवडणूक लढवणार नाही, असे पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्रशासकांनी जाहीर केला आहे. कार्यक्रमाप्रमाणे १७ ऑगस्टपर्यंत प्रत्येक संघटनेकडून दोन नावे मागविण्यात आली आहेत. राज्य कबड्डी संघटनेने आस्वाद पाटील यांचे नावे निश्चित केले आहे. तर दुसऱ्या नाव अद्याप निश्चित झालेले नाही. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा केली जात होती. पण, त्यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

राज्याची निवडणूक जवळ आली आहे. मी जे काम हाती घेतो, ते पूर्ण जबाबदारीने पार पाडतो. विधानसभा निवडणुकीमुळे भारतीय महासंघाच्या अध्यक्षपदासाठी मला वेळ देता येणार नाही. त्या पदासाठी वेळ देऊ शकत नसेल तर तिथे जाणे अयोग्य आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासमोर मांडली. त्यामुळे दुसऱ्या नावाचा शोध घेतला जात आहे. माझे नाव निश्चित झाले असून अन्य एका नावाबाबत चर्चा केली जात आहे, असे संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद यांनी सांगितले.