भारतीय ऑलिंपिक पात्र खेळाडूंच्या लशीकरण मोहिमेत नवा अडथळा

0
171

नवी दिल्ली, दि.१४ (पीसीबी) : भारताच्याऑलिंपिक पात्र खेळाडूंच्या लशीकरण मोहिमेने अजून म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. भारतीय ऑलिंपिक संघटना, क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्यात अजून चर्चेच्या फेऱ्याच होत आहेत.अशा वेळी जागितक उत्तेजक सेवन विरोधी संस्थेने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या लशीविषयी सर्व बारिकसारीक माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या मोहिमेत आता वाडाचा नवा अडथळा निर्माण झाला आहे.

भारताच्या ऑलिंपिक पात्र खेळाडूंना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेकने या लशीची निर्मिती केली आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून, सरकारने खेळाडूंना देण्यासाठी या लशीची निवड केली आहे. खेळाडूंना ही लस देण्यापूर्वी ती कशापासून तयार करण्यात आली आहे आणि त्यात काय समाविष्ट करण्यात आले आहे याची सविस्तर माहिती देण्यास ‘वाडा’ने सांगितले आहे.

एका संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) लशीची निर्मीती करणाऱ्या कंपनीकडे त्यामध्ये काय घटकांचा समावेश आहे याची विचारणा केली आहे. त्याचबरोबर लस घेतल्याने खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळणार नाहीत ना याबाबत खात्री मागितली आहे.

जागितक पातळीवर उत्तेजक विरोधी पथकात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही कोव्हॅक्सिनची चाचणी घेतली नसल्याचे सांगितले आहे. ‘वाडा’चे संचालक ऑलिव्हर निगली यांनी आभासी बैठक बोलावून या संदर्भात ‘नाडा’च्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. कोव्हॅक्सिनची पूर्ण चाचणी झाल्यानंतरच ती खेळाडूंना देण्यात यावी असे स्पष्ट आदेश ‘वाडा’ने भारतीय पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सीरमच्या कोव्हिसशिल्डला मान्यता
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीबाबत आपल्याला काहीच अडचण नसल्याचे ‘वाडा’ने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सरावासाठी पुणे येथे असलेल्या भारताच्या ऑलिंपिक पात्र तिरंदाजांना लष्कराच्या वतीने याच लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

औषधांची निर्मिती करणाऱ्या फिझर, अॅस्ट्राझेनेका अशा कंपन्यांबरोबर वाडाचा परस्पर सामंजस्य करार झाला आहे. औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी देखिल वाडाचे चांगले संबंध आहेत.

वाडाची मान्यता
नाडाचे संचालक नविन अगरवाल यांनी ‘वाडा’ला कोव्हॅक्सिन लशीबाबत कल्पना असून, त्यांनी तपासून पाहिली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘कोव्हिशिल्डची तपासणी वाडाकडून करण्यात आली आहे. त्यांनीच खेळाडूंना घेण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यांना फक्त लशीमध्ये काय घटकांचा समावेश आहे याची माहिती हवी आहे. आम्ही त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली आहे. ती माहिती मिळाल्यावर ‘वाडा’ पर्यंत पोचविण्यात येईल. अर्थात, ज्या खेळाडूंनी कोव्हिशिल्ड लस घेतली असेल, ‘नाडा’ त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिल. तशी कल्पना आम्ही ‘वाडा’ला दिली आहे. शेवटी खेळाडूची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची आहे.’